श्री देव हरिहरेश्वराच्या उत्सवासंबंधी माहिती

-: त्रिपुरोत्सव :-

शालिवाहन शके १७७५ च्या सुमारास (ई. सन १८५३) शिपोशी गावातील ब्राह्मण मंडळींनी या देवाचा उत्सव दरसाल कार्तिक शु. १० (दशमी) पासून १५ (पौर्णिमा) पर्यंत ६ दिवस यथाशक्ती वर्गणीने सुरु केला. हे श्री शंकराचे स्थान असल्याने वास्तविक या ठिकाणी शिवरात्रीचा उत्सव होणे युक्त होते; पण देवळे येथील खड्गेश्वराचा उत्सव शिवरात्रीसच होत असल्यामुळे व त्या उत्सवास हजर राहणे हे कर्तव्य असल्याने, मंडळींनी दूरदृष्टीने हा उत्सव कार्तिक महिन्यात (शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीशंकरांनीत्रिपुरासुराचा वध केल्यामुळे जो उत्सव तिन्ही लोकांत देवादिकांनी केला) त्याच निमित्ताने त्रिपुरोत्सव म्हणून सुरु केला.

 

सुवर्णमहोत्सव :

उत्सवफंडाची व्यवस्था चालू झाल्यास इ.स. १९५० साली ५२ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्या सालचा उत्सव विशेष स्वरुपात सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्या उत्सवाच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करून, स्वतंत्र निधी जमविण्यात आला व जनमनरंजनाचे व लोकशिक्षणाचे अनेक कार्यक्रम करण्यात आले. विशेषत: दशमीला शाहीर नानिवडेकर यांचे पोवाडे, एकादशीला मास्टर कृष्णराव यांचे गायन, द्वादशीला कै. गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन वादन, त्रयोदशीला बबनराव नावडीकर यांचे भावगीत गायन, चतुर्दशीला कै. राम मराठे यांचे गायन, पौर्णिमेला कै ह. भ. प. सोनोपंत दांडेकर यांचे निरुपण व त्यांनतर त्यांच्याच अध्यक्षतेखाली दे. भ. काकासाहेब तांबे, कै. ह. भ. प. बाळूबुवा अभिषेकी व कै. गोविंदबुवा आठल्ये यांचे सत्कार व प्रतिपदेला श्री. भालचन्द्रपंत पेंढारकर यांच्या कंपनीचे “सत्तेचे गुलाम” हे नाटक, याप्रमाणे विशेष कार्यक्रम करण्यात आले. कै. गंगाराम भास्कर आठल्ये, रा. विजापूर हे त्या उत्सवाचे व्यवस्थापक होते. या उत्सवाला उद्योगधंद्यानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या मंडळींनी सढळ हाताने मदत केली होती, तर ग्रामस्थ मंडळींनी पराकाष्ठेची अंगमेहनत घेतली होती, त्यामुळेच तो उत्सव संस्मरणीय असा झाला.

इतर माहिती :

इ.स. १९५० साली सुवर्ण महोत्सव साजरा झाल्यावर संस्थेचे अध्याख कै. विष्णू वासुदेव आठल्ये व उपाध्यक्ष कै. गंगाराम भास्कर आठल्ये हे निवृत्त झाले व त्यांच्या जागी अनुक्रमे कै. वैजनाथ विष्णू आठल्ये व कै. भालचंद्र वासुदेव जोशी यांची निवड करण्यात आली. सुवर्ण महोत्सवात त्या उभयतांनी विशेष मेहनत घेतल्यामुळेच तो यशस्वी झाला होता, हे सर्वांच्या निदर्शनाला आले होते. कदाचित त्यामुळेच पुढील पिढीवर अशा प्रकारे संस्थेची धुरा सोपविण्यात आली असेल, ते कसेही असो पण पूर्वीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी वेळोवेळी नाना प्रकारे संस्थेच्या कमी सर्वतोपरी जी मन:पूर्वक कामगिरी केली व इतरांस उदाहरण घालून दिले, त्याबद्दल ते प्रशंसेस नि:संशय पात्र होते. असो.

इ.स. १९५० साली धी बॉंबे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट पास झाला. त्या अॅक्टखाली या देवस्थानच्या बाबतीत प.ट्र.इ. नं. ४९२९/५२ चे काम चालले व ता. १०.११.१९५५ रोजी त्या प्रकरणाचा अंतिम निकाल लागून “श्रीहरिहरेश्वर देवस्थान, शिपोशी” हा शिपोशीकर आठल्यांचा ‘प्रायव्हेट ट्रस्ट’ म्हणून ठरला. त्यामुळे आपली धार्मिक श्रद्धा आता अबाधित राहू शकेल, देवाचे पावित्र्य राखले जाईल व आपल्या परंपरेचे पालन होऊ शकेल. या कामी त्यावेळचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल संस्था त्यांची ऋणी आहे.

त्यानंतर इ.स. १९५७ साली कै. वै. वि. आठल्ये, अध्यक्ष यांची मुंबई येथे प्रेसिडेन्सी मॅजीस्ट्रेट म्हणून नेमणूक झाली. त्याप्रीत्यर्थ त्यांनी देवाकडे ११११ रु. ४ आणि ३ पैसे अर्पण करून त्या सालचा उत्सव निरनिराळे कार्यक्रम करून स्वखर्चाने केला.

त्याच वर्षी श्री. पुंडलिक धोंडदेव आठल्ये, रा. बेळगाव यांनी हरिहरेश्वरचरणी नवस केला. त्याप्रमाणे बेळगाव नगरपालिकेत ते निवडून आले व त्याप्रीत्यर्थ इ.स. १९५८ चा उत्सव त्यांनी स्वखर्चाने भव्य प्रमाणात साजरा केला. त्यावेळी त्यांनी सबंध देवळावर विजेची रोषणाई करून अनेक स्पेशल कार्यक्रम केले. त्यात दारू सामान उडविण्याचा कार्यक्रम हा सर्वोत्कृष्ट झाला. या भागात असा कार्यक्रम तोपर्यंत केव्हाच झालेला नव्हता. एकंदरीत तो उत्सव अभूतपूर्व असाच झाला. त्याबद्दल ही संस्था श्री. पुंडलिकजी यांची फार आभारी आहे. अशाप्रकारे प्रतिवर्षी देवाच्या उत्सवाचे स्वरूप वाढत जाऊ लागले.

त्यापुढचा इ.स. १९५९ चा उत्सव संस्थेचे त्यावेळचे उपाध्यक्ष कै. भा. वा. तथा बंडोपंत जोशी हे असाच स्वखर्चाने करणार होते. पण दुर्दैवाने ता. २८.८.१९५९ रोजी संस्थेवर वाज्राघातच झाला! या संस्थेचे जणू प्राणच असे संस्थेचे माजी अध्यक्ष कै. ती. वि. वा. आठल्ये हे श्रीहरिहरेश्वरचरणी मुंबई येथे विलीन झाले! वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्याबद्दल  खालील ठराव करण्यात आला.

“ज्यांनी कायावाचामने श्रीहरिहरेश्वराची सेवा करण्यात आपले सर्व आयुष्य खर्च केले, ज्यांना श्रीहरिहरेश्वराचा उत्सव म्हणजे स्वत:चे जीवनसर्वस्व वाटे, जे इ.स. १९०१ ते १९४० पर्यंत या देवस्थानचे सेक्रेटरी होते व १९४० ते १९५० पर्यंत अध्यक्ष होते, ज्यांनी जनमनरंजन व लोकशिक्षण हे दोनही हेतू समोर ठेवून या उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक ज्योत सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला, जे गेली साठ वर्षे उत्सवाला हजर राहून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करीत होते, ज्यांनी उत्सवाला नियमबद्धता आणून त्याला आजचे शिस्तबद्ध व रेखीव स्वरूप प्राप्त करून दिले, ज्यांनी शिपोशीबाहेर असलेल्या अनेक ग्रामस्थांच्या मनात या उत्सवासंबंधी प्रेमभावना उत्पन्न करून सर्वांमध्ये ऐक्यभाव निर्माण केला, ज्यांना श्रीहरिहरेश्वर देवास्थानासंबंधी नेहमी तळमळ लागलेली दिसून येई, ज्यांच्यापासून कित्येकांनी स्फूर्ती, उत्साह व आनंद यांचा संदेश घेतला, जी आनंदमूर्ती आपणामध्ये नेहमी वावरत असावयाची, ज्यांची प्रेमळ दृष्टी, आत्मविश्वास व धर्मावरील अढळ श्रद्धा शेवटपर्यंत कायम राहिली ते आमचे दादा श्री वि. वा. आठल्ये हे मुंबई येथे ता. २८.८.१९५९ रोजी कैलासवासी झाले. त्यामुळे या सभेला अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या निधनाने या संस्थेची कधीही भरून न निघणारी अशी हानी झाली आहे. त्यांच्या पुण्यात्म्यास श्रीहरिहरेश्वर सद्गती देवो हीच प्रार्थना.” योगायोग असा की, ज्या दिवशी ती. दादा हे मुंबईला कैलासवासी झाले त्याच दिवशी शिपोशी येथे वे. सखाराम भास्कर आठल्ये हेही कैलासवासी झाले! ते चांगले वैदिक होते, श्रीहरिहरेश्वराचे भक्त होते व परम धार्मिक होते. त्यांच्या निधनाने सनातन धर्माचा एक कट्टर अनुयायी व अभिमानी गेला. श्रीहरिहरेश्वर त्यांना सद्गती देवो ही प्रार्थना!

 

हीरकमहोत्सव :

इ.स. १६० साली संस्थेचे त्यावेळचे उपाध्यक्ष कै. भा. वा. तथा बंडोपंत जोशी यांना ५१ वे वर्ष लागले व त्याच वेळेस संस्थेच्या हीरक महोत्सवाचा सुयोग आला. या उत्सवखर्चाकरिता त्यांनी १००१ रु. दिले व त्या सालचे व्यवस्थापक होण्याचेही मान्य केले. सुवर्ण महोत्सावाप्रमाणेच ही उत्सव भव्य प्रमाणावर व स्वतंत्र निधी जमवून साजरा झाला. मात्र या उत्सवात कार्यकारी मंडळाचे एक प्रमुख सभासद, शिपोशीचे एक जुने व जाणते कार्यकर्ते व श्रीहरिहरेश्वराचे एक नि:सीम भक्त कै. रामचंद्र हरी आठल्ये हे ऑगस्ट १९६० मध्ये कैलासवासी झाल्याने आपल्यात नाहीत याबद्दल सर्वांनाच राहून राहून वाईट वाटले! त्यांची उणीव सदैव भासणारच!

वार्षिक सभेत त्यांच्याबद्दल खालील ठराव करण्यात आला.

आपल्या कार्यकारी मंडळाचे सभासद श्री. रा. ह. आठल्ये यांच्या निधनाने या संस्थेला अत्यंत दु:ख होत आहे. गेली ४०/५० वर्षे ते श्रीहरिहरेश्वर देवस्थानच्या प्रत्येक बाबतीत जातीने लक्ष घालीत. ज्यांनी उत्सवात नवचैतन्य निर्माण केले व नाना फडणीसांप्रमाणे ज्यांची बुद्धिमत्ता शिपोशीकरांस हर कार्यात उपयोगी पडत असे, जे उत्सवप्रसंगाने आपल्या सर्व नातेवाईकांना व इष्टमित्रांना एकत्र जमवून उत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण करीत असत. गावातील कोणतीही प्रमुख कामगिरी आपल्या शिरावर घेऊन ज्यांनी ती कित्येक वर्षे यशस्वीरीत्या पार पाडली, जे गुणांची योग्य पारख करणारे समयसूचक, कार्यक्षेत्राची मर्यादा सांभाळून माणुसकीने वागणारे व योग्य तोच सल्ला देऊन कोणत्याही सत्कृत्यात हमखास उपयोगी पडणारे होते: ते श्रीहरिहरेश्वराची प्रथा समजून घेऊन त्याप्रमाणे वागणारे व मार्गदर्शन करणारे कै. रामभाऊ आमच्यातून गेल्याने आम्हा सर्वांस अत्यंत शोक होत आहे. श्रीहरिहरेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

या हीरक महोत्सवात पुढीलप्रमाणे स्पेशल कार्यक्रम करण्यात आले.

कै. बालगंधर्व यांचे गायन

कै. दिक्षितबुवा यांचे भजन

कै. प्रो. जादूगार रघुवीर, पुणे यांचे जादूचे प्रयोग

याच उत्सवात म.म. दत्तो वामन पोतदार, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे उपाध्यक्ष व त्या सालचे उत्सव व्यवस्थापक कै. भालचंद्र वासुदेव तथा बंडोपंत जोशी यांचा अनेक संस्थांतर्फे, त्यांना ५१ वे वर्ष लागल्याने सत्कार समारंभ भव्य प्रमाणात साजरा करण्यात येऊन, त्यांच्या सदैव आदरणीय व अनुकरणीय अशा श्री. नाना अभ्यंकर लिखित चरित्राचे प्रकाशनही करण्यात आले. हा सत्काराचा सर्व सोहळा अगदी अभूतपूर्व असाच झाला व त्यायोगे श्रीमान बंडोपंत जोशी यांच्याबद्दल समाजाला वाटणारे अपूर्व प्रेम व जिव्हाळा व्यक्त झाला. हा सत्कार समारंभ अशा तऱ्हेने साजरा होण्याच्या कामी कै. बंडोपंत जोशी यांचे परममित्र व संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष कै. तात्यासाहेब आठल्ये यांनी जीवापाड मेहनत घेतली होती व त्या कामी त्यांना सर्वांनीच हार्दिक सहकार्य दिले होते.

या उत्सवात इलेक्ट्रिक लाईटची सोय करण्यात आली होती, व त्याचा खर्च एक हजार रुपये श्रीमान पुंडलिक धोंडो आठल्ये, रा. बेळगाव यांनी केला. हा हीरक महोत्सव कल्पनातीत यशस्वी व संस्मरणीय असा झाला.

 

************************************************************************