श्री विष्णू

(१)

आवडी गंगाजळे देवा न्हाणिले l

भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पीले l

अहं का धूप जाळू श्रीहरिपुढे l

जंव जंव धूप जळे l तंव तंव देवा आवडे llll

आरती आरती करू गोपाला l मी तू पण सांडोनी वेळोवेळा llध्रुll

रमावल्लभदासे अहं धूप जाळीला l

एका आरतीचा मग प्रारंभ केला l

सोहं हा दीप ओवाळू गोविंदा l

समाधी लागली पाहता मुखारविंदा llll आरती...

हरीखे हरीख होतो मूख पाहता l

प्रकटल्या ह्या नारी सर्वही अवस्था l

सद्भावालागी बहु हा देव भूकेला l

रमावल्लभदासे अहं नैवेद्य अर्पिला llll आरती...

फल तांबूल दक्षिणा अर्पिली l

तया उपरी निरांजने मांडली l

पंचप्राण पंचज्योती आरती उजळली l

विश्व हे लोपले तया प्रकाशातळी llll आरती...

आरती प्रकाशे चंद्रसूर्य लोपले l

सुरवर नभी तेथे तटस्थ ठेले l

देवभक्तपण अवघे न दिसे काही l

ऐशापरी दास रमावल्लभा पायी llll आरती...

 

 

 

श्री विष्णू

(२)

अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा l

आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा l

पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा l

निजपद देउनी हरिसी भ्रांतीच्या पाशा llll

जयदेव जयदेव जय सुखकरमूर्ती l

गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती llध्रुll

पयसागर जाकांता धरणीधर शयना l

करुणालय वारिसी भव वरिज दल नयना l

गरुडध्वज भजनप्रिय पीत प्रभवसना l

अनुदिनी तव कीर्तनरस चाखो हे रसना llll जयदेव...

नंदिवहना गहना पार्वतीच्या रमणा l

मन्मथदहना शंभो वातात्मज नयना l

सर्वोपाय विवर्जित तापत्रय शमना l

कैलासाचल वासा करिती सुरनमना llll जयदेव...

पद्म बोधकरणा नेत्रभ्रम हरणा l

बोधनबंधन हर्ता द्योतक आचरणा l

किरणस्पर्शे वारिसी या तम आवरणा l

शरणागत भयनाशन सुखवर्धन करणा llll जयदेव...

त्रिभुवनउत्पती पालन करिसी तू माया l

नाही तुझिया रूपा दुसरी उपमा या l

तुझे गुणगण महिमा न कळे निगमा या l

करुणा करिसी अंबे मनविश्रामाया llll जयदेव...

 

श्रीलक्ष्मी पल्लीनाथ

श्रावणमासी रविदिनी जे दर्शन घेती l

त्यांची सर्वही पापे नाशाप्रती जाती l

प्रेमानंदे त्याची करिता ही स्तुती l

अंती निजपद पावुनी मुक्तिसी जाती llll

जय देव जय देव जय पल्लीनाथा l

भावे तुझिया चरणी ठेविला माथा llध्रु.ll

कोकणप्रांती नांदे दक्षिण केदार l

करावया पापीयांचा उद्धार l

ब्रह्मा, विष्णू, शंकर हे एकाकार l

भक्तालागी येथे धरिला अवतार llll जय...

भक्तजनांचा हा हो देव भुकेला l

यास्तव येतो नित्य यात्रेचा मेळा l

दर्शन घेऊनि जाती आपुल्या हो स्थळा l

भावे हृदयी जपती नामाची माळा llll जय...

पल्लीक्षेत्री नांदे अमुचा कुलस्वामी l

सेवेसी तत्पर आहे ती लक्ष्मी l

अज्ञान मूढ जन हे सर्वस्वे आम्ही l

यास्तव जडो प्रीती तुझिया नामी llll जय...

त्रिमूर्ती देव हा आहे पै जाण l

कराया भक्तांचे प्रेमे पाळण l

धरिले अवनीवरी रूप हे सगुण l

ह्मणऊनी सखाराम वंदित चरण llll जय...

 

 

 

 

 

श्रीगणपती

(१)

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची l

नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची l

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची l

कंठी झळके माळ मुक्ताफळांची llll

जय देव जय देव जय मंगल मूर्ती l

दर्शनमात्रें मनकामना पूरती llध्रु॰ll

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा l

चंदनाची उटी कुंकुमकेशरा l

हिरेजडित मुकुट शोभतो बरा l

रुणझुणती नूपुरें चरणी घागरिया l

जय देव जय देव जय मंगल मूर्ती l

दर्शनमात्रें मनकामना पुरती llll

लंबोदर पितांबर फणिवरबंधना l

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना l

दास रामाचा वाट पाहे सदना l

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना l

जय देव जय देव जय मंगल मूर्ती l

दर्शनमात्रें मनकामना पुरती llll

 

 

(२)

पाश करि उत्पल शंख गदा l

चक्रधन्याग्रऋजा सुखदा l

इक्षु धनु मातुलिंग सुसदा l

हरी निज दंत कृतांत मदा llचाल ll

विराजे रत्न कलशशुंडा l

दंड अति प्रचंड, मंडित उदंड, वरदित

अखंड, किल ब्रह्मांड मंडनाची l

प्रभातं शंड खंडनाची llll

आरती जगत्दनाची उमाशिवसांबनंदनाची llध्रु॰ll

स्वये जी भूषविणार जगा l

वल्लभा दिव्य भव्य सुभगा l

स्वहस्ती अमल कमल इभगा l

विहग गजवक्रहंस विहगा llचालll

विजेपरिरंभणानुसरली l करुनी चपलता l

परि न विकलता, तरुसि जशी लता वसंताची l

सता शीलता सुसंताची llll आरती...

प्रथम उत्पन्न विश्वकर्ता l

प्रकृती रक्षुनि प्रलयहर्ता l

गुणागुण वेदशास्त्र पढता l

सकल सिध्यर्थ स्वार्थभर्ता llचालll

असा विघ्नेश ईश ध्यावा l

अभय करणार, विभय हरणार l

सुकवि तरणार सदैवाची l

कुमति हरणार राघवाची llll आरती...

 

(३)

विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना l

आरती मी करितो तुज पुरवि कामना llध्रु॰ll

भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी l

मूर्ती करुनी सर्व लोक पूजिती घरी l

महिमा तव वर्णवे न पापगिरी हरी l

येई l धाई l पाही l करुनि त्वरा l

विघ्नहरा l दे सुगिरा l हे कृपाघना llll विघ्नांतक...

संकटि जे पडुनि प्रभो स्मरती तुजला l

मुक्त करिसी जगती या खचित त्यांजला l

जाणुनि हे तव भजनी ध्यास लागला l

गातो l ध्यातो l नमितो l तारि आतां l

या भक्ता l दयावंता l गौरीनंदना llll विघ्नांतक...

 

(४)

गणराया आरती ही तुजला llध्रु॰ll

रुणझुण पायी वाजती घुंगुर l

गगनि ध्वनी भरला llll गणराया...

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थीसी l

पूजिती जन तुजला llll गणराया...

गंध, पुष्प, धूप, दीप समर्पुनी l

अर्पिती पुष्पांला llll गणराया...

भक्त हरी हा आठवितो रूप l

गातो तव लीला llll गणराया...

 

(५)

नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रे l

लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे l

ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे l

अष्टही सिद्धि नवनिधी देसी क्षणमात्रे llll

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती l

तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती llध्रु॰ll

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती l

त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती l

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती l

सर्वही पावुनी अंती भवसागर तरती llll जयदेव...

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी l

कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणी l

त्रैलोक्यी ते निजयी अद्भुत हे करणी l

गोसावीनंदन रत नामस्मरणी llll जयदेव...

 

 

(६)

आरती करू तुज मोरया l

मंगल गुणनिधी राजया llध्रु॰ll

सिद्धीबुद्धी पती संकटनाशा l

विघ्ननिवारण तू जगदीशा llll आरती...

धुंडीविनायक तू गजतुंडा l

सिंदूर चर्चित विलसित शुंडा llllआरती...

गोसावीनंदन तन्मय झाला l

देखोनिया देवा तुज शरण आला llll आरती...

 

श्रीशंकर

(१)

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा l

विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा l

लावण्य सुंदर मस्तकीं बाळा l

तेथूनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा llll

जयदेव जयदेव जय श्रीशंकरा l

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा llध्रु॰ll

कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा l

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा l

विभूतीचे उधळण शितिकंठ निळा l

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा llll जयदेव...

देवी-दैत्यीं सागरमंथन पै केले l

त्यामाजी अवचित हलाहल जे उठिले l

तें त्वां असुरपणे प्राशन केले l

नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले llll जयदेव...

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी l

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी l

शतकोटींचे बीज वाचे उच्चारी l

रघुकुळटिळक रामदासा अंतरी llll

 

 

(२)

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो l

त्रिशूल पाणि शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो l

वृषभारूढ फणिभूषा दशभुज पंचानन शंकरा हो l

विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो llध्रु॰ll

पडले गोहत्येचे पातक गौतम ऋषिच्या शिरी हो l

त्याने तप मांडिले ध्याना आणूनि तुज अंतरी हो l

प्रसन्न तू झालास स्नाना दिधली गोदावरी हो l

औदुंबर मुळी प्रगटे पावन त्रैलोक्याते करि हो llll जय...

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो l

आणिकही बहु तीर्थे गंगाद्वारादिक पर्वती हो l

वंदन मार्जन करिती त्यांचे महा दोष नासती हो l

तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तिते पावती हो llll जय...

ब्रह्मगिरीचा भावे ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो l

तैं तैं काय कष्टे जंव जंव चरणी रूपती खडे हो l

तंव तंव पुण्यविशेष किल्मिष अवघे त्यांचे झडे हो l

केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो l

लावुनिया निज भजनी सकळहि पुरविसी मनकामना हो l

संतति संपति देसी अंती चुकविसी यमयातना हो l

शिव शिव नाम स्मरता आनंद वाटे माझ्या मना हो l

गोसावीनंदन विसरे संसारयातना हो llll जय...

 

 

(३)

जयजयाजी मदनांतक गौरीशंकरा l

पंचारती करितो तुज हे महेश्वरा llध्रु॰ll

व्याघ्रांबर अंगी तू नित्य सेवेसी l

रुंडमाळ कंठी असे मस्तकी शशि l

गिरिजा तव वामांकी शोभते तशी l

भस्मप्रिया भूतपते इंदुशेखरा llll जय...

बहु दुर्जन त्रिपुर दैत्य प्रबल जाहला l

हरि विधीसह विबुध पिडूनी त्रास दिधला l

तेव्हां ते अति भावे स्तविती मग तुला l

त्रिपुरासुर वधुनि सुखी करिसी सुरवरा llll जय...

एकवीस स्वर्गीहुनी उंची तव अती l

सर्वेशा दाता तू सद्गतीप्रती l

तव लीला वर्णनासी अल्प मम मती l

विठ्ठलसुत विनवीतसे रक्षी किंकरा llll जय...

(४)

जय जय आरती पार्वतीरमणा l

भवभयनाशना दुष्ट निकंदना llध्रु॰ll

पंचवदन दशभुज विराजे l

जटाजूटी गंगा सुंदर साजे llll जय...

कंठी रुंडमाळा हस्तिंकपालl

वाहन नंदी शोभे भूषण व्याल llll जय...

गजचर्मांबर तव परिधान l

त्रिशूलधारण भस्मविलेपन llll जय...

दिगंबररुपा शिवमहारुद्रा l

वासुदेव प्रार्थी ज्ञानसमुद्रा llll जय...

 

श्रीराम

(१)

अवतरला रघुपती जे l आनंदली वसुधा ते ll

गंधर्व वनिता माध्यान्ह समयी l मंगल घोषे नाचती थै थै llध्रु॰ll

अमृत कल्यावल्या l चाफेकळ्या त्या फुलल्या ll

प्रसूत झाली श्री कौसल्या l सरिता वाहे अमृततुल्या llll अवतरला..

वाजंत्राचे जोड वाजती द्वारापुढे ll

अंगणि कुंकुम केशरी सडे l गुढिया मखर चहुकडे llll अवतरला..

क्षीराब्धी सम वाडे l सुरतरुची फुलझाडे ll

अरुंधती बाळंतिणीकडे l वाटीतसे हो बोळवीडे llll अवतरला..

देवाधर्मासाठी l किती सोसू आटाटी ll

मुक्तीचे मस्तकी देऊनी पाटी l मध्वमुनीश्वर साखर वाटी llll अवतरला..

 

(२)

श्यामसुंदर रामाचे चरणकमळी l

ओवाळू आरती कनकपरियळी llध्रु॰ll

बाळा मुग्धा यौवन प्रौढा सुंदरी l

आरत्या घेऊनी आलिया नारी llll श्याम...

चौघे ह्मणती निजगती चला मंदिरा l

नव त्याही इच्छिती सेवा सुंदरा llll श्याम...

दास ह्मणे सुमन शेजे चला श्रीहरी l

क्षण एक विश्रांति करा अंतरी llll श्याम...

 

 

(३)

त्रिभूवन मंडित माळ गळा l

आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा llll

श्रीराम जय राम जय जय राम l

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम llध्रु॰ll

ठकाराचे ठाण करी धनुष्य बाण l

मारुती सन्मुख उभा कर जोडूनllll श्रीराम...

भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या ढाळिती l

स्वर्गीहुनी देव पुष्पवृष्टि करिती llll श्रीराम...

रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी l

आरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी llll श्रीराम...

विष्णूदास नामा ह्मणे मागतो तू ते l

आरती ओवाळू पाहू सीता पती तेllllश्रीराम...

श्रीकृष्ण

चरणकमल ज्याचे अतिसुकुमार l

ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर llll

ओवाळू आरती मदनगोपाळाl

श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा llध्रु॰ll

नाभिकमली ज्याचे ब्रह्मयाचे स्थान l

हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन llll ओवाळू...

मुखकमल पाहता सूर्याच्या कोटी l

मोहियले मानस कोंदियली दृष्टी llll ओवाळू...

जडितमुगुट ज्याचा देदीप्यमान l

तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन llll ओवाळू...

एका जनार्दनी देखियले रूप l

रूप पाहो जाता जाहलो तद्रूप llll ओवाळू...

(२)

अवतार गोकुळीं हो l जन तारावयासी l

लावण्यरूपडें हो l तेज:पुंजाळ राशी ll

उगवले कोटीबिंब l रवि लोपला शशी l

उत्साह सुरवरा l महाथोर मानसी llll

जय देवा कृष्णानाथा l राई रखुमाईकांता l

आरती ओवाळीन l तुम्हां देवकीसुता llध्रु॰ll

कौतुक पहावया l माव ब्रह्मयाने केली l

गोधने चोरूनिया l सत्य लोकासी नेली ll

गोपाळ, गाईवत्सें l दोन्ही ठायी रक्षिली l

सुखाचा प्रेमसिंधू l अनाथांचा माउली llll जय...

चारिता गोधने हो l इंद्र कोपला भारी l

मेघ जो कडाडीला l शिला वर्षल्या धारी ll

रक्षिले गोकुळ हो l नखीं धरियेला गीरी l

निर्भय लोकपाळ lअवतरला हरी llll जय...

वसुदेव देवकीची l बंद फोडिली शाळा l

होऊनिया विश्वजनिता l तया पोटीचा बाळ ll

दैत्य हे त्रासियेले l समूळ कंसासी काळ l

राज्य दे उग्रसेना l केला मथुरापाळ llll जय...

तारिले भक्तजन l दैत्य सर्व निर्दाळूनि l

पांडवां साहाकारी l अडलिया निर्वाणी ll

गुण मी काय वर्णू l मति केवढी वानू l

विनवितो दास तुझा l ठाव मागे चरणी llll जय...

 

 

()

श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी l

आरती करितो बहु प्रेमाने, भवभयसंकट दूर करी llध्रु॰ll

दानव दमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी l

भक्तकाज कल्पद्रुम ह्मणुनि निशिदिनीं ध्याती भक्त तुशी ll

अतिविषधर जो काळा फणीवर कालिया यमुना जलवासी l

तत्फणिवर तू नृत्य करुनी पोचविले त्या मुक्तीशी llll शामल...

कैटभ चाणूर कंसादिक हे शौर्ये वधिले अमित अरी l

नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी ll

अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यातें मुक्त करी l

दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी llll शामल...

 

श्री दत्तात्रय

(१)

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी तारी तारी मजला l

दयाळा तारी तारी मजला l श्रमलो मी या प्रपंचधामी

आलो शरण तुला llध्रु॰ll

करिता आटापाटी प्रपंच अवघा दिसतो

मिथ्यत्व, अवघा दिसतो मिथ्यत्व l

ह्मणवुनि भजन तुझे मज देवा भासे सत्यत्व llll श्रीपाद...

किंचिन्मात्र कृपा जरी मजवरी करिसी उदार मन l

दयाळा करिसी उदार मन l चुकलो मी या विषयसुखाच्या

आहारातुनी जाण llll श्रीपाद...

कृष्णातटि निकटी जो विलसे औदुंबर

छायी दयाळा औदुंबर छायी l हंस परात्पर

भारतीनायक लीन तुझे पायी llll श्रीपाद...

 

(२)

आरती दत्तराजगुरुची l भवभयतारक स्वामीची llध्रु॰ll

दिगंबर उग्र ज्याची मूर्ती lकटिवर छाटी रम्य दिसती l

चचुनी अंगी सर्व विभूती l कमंडलू धरोनिया हाती llचाल ll

पृष्ठी लोळे जटेचा भार lऔदुंबरतळी, कृष्णेजवळी l

प्रभातकाळी, वर्णिती भक्त कीर्ति ज्याची l

दिगंतरी वाहे कीर्ति ज्याची llll आरती...

अनुसयेच्या त्वां पोटी l जन्म घेतला जगजेठी l

दिव्यतव पादभक्तिसाठी l

जाहली अमितशिष्य दाटी llचाल ll

राज्यपद दिधले रजकाला l जो रत झाला, त्वत्पदकमला l

किमपि न ढळला, पाहूनि पूर्ण भक्ती त्याची l

अंती दिली मुक्ती त्वांची llll आरती...

सती तव प्रताप ऐकोनी l आली पतिशव घेवोनि l

जाहली रत ती तव चरणी lक्षणभंगुर भव मानोनी llचालll

तिजला धर्म त्वांचि कथिला, जी सह्गमनी l

जाता आणुनि, तीर्थ शिंपुनी, काया सजीव केली पतिची l

आवड तुज बहु भक्तांची llll आरती...

ऐसा अगाध तव महिमा l नाही वर्णाया सीमा l

धनाढ्य केला द्विजोत्तमा l दरिद्र हरुनी पुरुषोत्तमा llचालll

नेला तंतुक शिवस्थानी lवांझ महिषिसी, दुग्ध दोहविसी,

प्रेत उठविसी lकाया बहुत कुष्ठी ज्याची l

केली पवित्र ते साची llll आरती...

ठेवूनि मस्तक तव चरणी l जोडूनी दामोदर पाणि l

ऐसी अघटित तव करणी l वर्णू न शके मम वाणी llचालll

अहा हे दिनानाथा स्वामिन्, धाव दयाळा l

पूर्ण कृपाळा, श्रीपादकमळा, परिसुनी विनंती दासाची l

भक्ती दे त्वत्पदकमलाची llll आरती...

 

(३)

आरती दत्तात्रय प्रभूची l करावी सद्भावे त्याची llध्रु॰ll

श्रीपादकमला लाजविती l वर्तुल गुल्फ रम्य दिसती ll

कटिस्थित कौपिन ती वरती l छाटी अरुणोदय वरि ती llचाल ll

वर्णू काय तिची लीला l हीच प्रसवली, मिष्टान्न बहु,

तुष्टचि झाले, ब्रह्मक्षेत्र आणि वैश्य शूद्रही सेवूनिया जीची ll

अभिरुची सेवूनिया जीची llll

गुरुवर सुंदर जगजेठी lज्याचे ब्रह्मांडे पोटी l

माळा सुविलंबित कंठी l बिंबफळ रम्य वर्णू ओष्ठी llचालll

अहा ती कुंदरदन शोभा l दंडकमंडलू, शंखचक्र अन्,

गदापद्म करी, जटामुकुट शिरी, शोभतसे ज्यासी l

मनोहर शोभतसे ज्यासी llll

रुचिरा सौम्य युग्मदृष्टी lजिने द्विज तारियला कुष्ठी ll

दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी l केला तिनेच संतुष्टी llचालll

दयाळा किती ह्मणुनि वर्णू l वंध्या वृद्धा, तिची सुश्रद्धा,

पाहुनी विबुधची lपुत्ररत्न जिस देऊनिया सतीची l

इच्छा पुरविली मनिची llll

देवा अघटित तव लीला l रजकही चक्रवर्ती केला ll

दावून विश्वरूप मुनिला l द्विजोदरशूल पळे हरिला llचालll

दुभविली वांझ महिषी एक l निमिषामाजी, श्रीशैल्याला

तंतुक नेला, पतिताकरवी वेद वदविला, महिमा अशी ज्याची,

स्मराहो महिमा अशी ज्याची llll

वळखुनी शूद्रभाव चित्ती l दिधले पीक अमित शेती l

भूसर एक शुष्क वृत्ती l क्षणार्धे धनद तया करिती llचालll

ज्याची अतुल असे करणी l नयन झाकुनि, सवे उघडिता

नेला काशिस, भक्त पाहता, वार्ता अशी ज्याची l

स्मराहो वार्ता अशी ज्याची llll

दयाकुल औदुंबरी मूर्ती l नमिता होय शांतवृत्ती

न देती जनन मरण पुढती l सत्य हे न धरा मनी भ्रांति llचालll

सनातन सर्व साक्षी ऐसा l दुस्तर हा भव, निस्तरावया,

जाऊनि सत्वर, आम्ही सविस्तर, पूजा करू त्याची l

चला हो पूजा करू त्याची llll

तल्लीन होऊनि गुरुचरणी l जोडूनी भक्तराज पाणि

मागे हेचि जनक जननी l अंती ठाव देउ चरणी llचालll

नको मज दुजे आणिक काही l भक्तवत्सला, दीनदयाळा,

परमकृपाळा, दास नित्य याची उपेक्षा करू नको साची llll आरती..

 

(४)

त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा l

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा l

नेति नेति शब्द न ये अनुमाना l

सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना llll

जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता l

आरती ओवाळिता हरली भवचिंता llध्रु॰ll

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त l

अभाग्यासी कैंची कळेल ही मातl

पराही परतली तेथे कैंचा हा हेत l

जन्ममरणाचाही पुरलासे अंत llll

दत्त येऊनिया उभा ठाकला l

सद्भावे साष्टांगे नमुनी प्रणिपात केलाl

प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला l

जन्ममरणाचा फेरा चुकविला llll

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान l

हरपले मन झाले उन्मन l

मी तू पणाची झाली बोळवण l

एका जनार्दनी श्री दत्तध्यान llll

 

(५)

आरती भुवनसुंदराची l इंदिरा वरा मुकुंदाची llध्रु॰ll

पद्मसम पादयुग्मरंगा l ओवाळणी होती भृंगा l

नखमणि स्रवताहे गंगा l जे का त्रिविध तापभंगा llचालll

वर्तुळ गुल्फ भ्राजमाने l किंकीणी क्वणित नाद घणघणित l

वांकीवर झुणित, नूपुरे झनन मंजिराची l झनन ध्वनी मंजिराची llll

पीतपट हाटक तप्त वर्णी l कांची नितंब सुस्थानी l

नाभिची अगाध हो करणी l विश्वजनकाची जे जननी llचाल ll

त्रिवली ललित उदरशोभा l कंबुगळा माळ, विलंबित झळाळ l

कौस्तुभ सरळ बाहु श्रीवत्सतरळ मणिमरळ कंकणाची l

प्रीति बहु जडित कंकणाची llll आरती...

इंदुसम आस्य कुंदरदना l अधरारुणार्क बिंबवदना l

पाहता भ्रांति पडे मदना l सजल मेघाब्धि दैत्यदमना llचालll

झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली l

मयुर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित l

कृष्णकस्तुरीची अक्षता काळी कस्तुरीची llll आरती...

कल्पद्रुमातळी मूर्ती l सौदामिनी कोटीदीप्ती l

गोपी गोपवलय भवती l त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती llचालll

मंजुळ मधुर मुरलीनादे l चकित गंधर्व चकित अप्सरा l

सुरगिरीवरा, कर्पुराधर रतीने प्रेमयुक्त साची l

आरती ओवाळित साची llll आरती...

वृन्दावनीचिये हरणी l सखे गे कृष्ण माय बहिणी l

श्रमलो भवाब्धिचे फिरणी lआता मज ठाव देई चरणी llचालll

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका l नमितो चरण शरण मी करुणा येऊ दे l

विशाळपाणि कृष्ण नेणते, बाळ आपुले राखि लाज याची l

दयानिधे राखि लाज याची llll आरती...

 

आरती दशावताराची

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म l

भक्तसंकटी नाना स्वरूपी स्थापिसी स्वधर्म llध्रु॰ll

अंबऋषीकारणे गर्भवास सोशिसी l

वेद नेले चोरुनि ब्रह्या आणुनिया देसी l

मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडिसीl

हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी llll आरती...

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी l

परोपकारासाठी देवा कासव झालासी l

दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरूपी होसी l

प्रल्हादाकारणे स्तंभी नरहरी गुरगुरसी llll आरती...

पाचवे अवतारी बळीच्या द्वाराला जाशी l

भिक्षे स्थळ मागूनि बळीला पाताळी नेसी l

सर्व समर्पण केले ह्मणुनि प्रसन्न त्या होसी l

वामनरूप धरूनि बळीच्या द्वारी तिष्ठसी llll आरती...

सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला l

कष्टी ते रेणुका ह्मणुनि सहस्रार्जुन वधिला l

नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला l

सहावा अवतार परशुराम प्रगटला llll आरती...

मातला रावण सर्वा उपद्रव केला l

तेहतीस कोटी देव बंदी हरले सीतेला l

पितृवचनालागी रामे वनवास केला l

मिळोनी वानरसहित राजा राम प्रगटला llll आरती...

देवकी वासुदेव बंदी मोचन त्वां केले l

नंदा घरी जाऊन निजसुख गोकुळा दिधले l

गोरस चोरी करीता नवलक्ष गोपाळ मिळविले l

गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले llll आरती...

बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा l

सांडूनि दिधला धर्म ह्मणोनी नंदाची सेवा l

म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणुनि कलंकी केशवा l

बहिरवी जान्हवी द्यावी निजसुखा नंदसेवा llll आरती...

 

 

 

 

 

महिषासुरमथीनी

महिषासुरमथीनी देवि त्रिपुरसुंदरी l

ओवाळीन पंचारती घेऊनि करी llध्रु॰ll

रत्नजडित सिंहासनी नित्य बैससी l

दीप्तीने लाजविले भास्कर शशी l

अष्टभुजा देवी तुज पुजू भक्तीसी l

देई येई पाही l सुखसदने l मृगनयने l

शशिवदने l पाव झडकरी llll महिषासुरमर्दिनी ...

मारूनिया चंड मुंड देव रक्षिसी l

अवतरुनी भूमीवरी भक्त तारिसी l

ओवाळीत वासुदेव प्रार्थितो तमी l

शक्ते l माते l ललिते l भयहरणे l

सुखकरणे शिवरमणे l मुक्त मज करी llll महिषासुरमर्दिनी ...

 

 

 

श्री अंबाबाईची आरती

ओवाळीन ओजा. शिवसहजा, आदिभवानी गिरिजा ll

कल्लोलस्तरजा l चारूभुजा l आई, तुकाई तुळजा ll

शाकंभरी भर्गा l नवदुर्गा l हिंगुळगिरीहिंगुळजा ll

निवास पुर लक्ष्मी, महालक्ष्मी कोल्हापूर पट्टणजा llll

मूका मीनाक्षी l कामाक्षी l सर्वही कर्नाटकजा ll

व्याघ्रालय पुरजा lगुग्गुळजा l भिल्ली रंजित पुंजा ll

पट्टणपुर चंडी l श्री चंडी l निरह:स्तेज पुंजा ll

कोटी मुखज्वाला l श्री बाला l विमलामंगलगिरिजा llll

देई या भक्ति l श्री ललीता l पूजिन मी सुखसरिता ll

अंबा, डंबरजा l तळवटजा l युव हा मंडप महजा ll

विंध्या चलसदन l ददिसदन l देवि यशोदा तनुजा ll

तारा भुवनेशी l पंचदशी l ब्रह्मनंदी गिरिजा llll

दर्या इंद्राक्षी, पिंगाक्षी l लंकाकित ऋषिवटिजा ll

तैलं कोकणजाl पंकज जा l लवणासुर मर्दने अनेक पुरवणजा ll

अमित भुजा l कारणरुपा विरजा कालेश्री घीषण ll

विविध गुण l सत्यद्रुमजा द्रुमजा ll

योगे श्री विद्या l श्रीविद्या l घिरडा मणिक गिरिजा llll

ओवाळीन ओजा ll

 

नरहरी

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन l

अवनी होत आहे कंपायमान l

तडतडली नक्षत्रे पडताती जाण l

उग्ररूपे प्रगटे तो सिंहवदन llll

जयदेव जयदेव जय नरहरीराया l

आरती ओवाळू महाराजवर्या llध्रु॰ll

एकवासी स्वर्गमाळा डळमळली कैसी l

ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी l

चंद्रसूर्य दोन्ही लोपती प्रकाशी l

कैलासी शंकर दचके मानसी llll जय...

थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित l

तीक्ष्ण नखे तो दैत्य बिदारिन l

अर्धांगी कमलजा शिरी छाया धरीत l

माधवदास स्वामी नरहरी शोभत llll जय...

 

विठ्ठलाची आरती

(१)

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा l

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा l

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा l

चरणी वाहे भिमा उद्धारी जगा llll

जय देव जय देव जय पांडुरंगा l

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा llजय.llध्रु॰ll

तुळसीमाळा गळा कर ठेवूनि कटी l

कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी l

देव सुरवर नित्य येती भेटि l

गरुड हनुमंत पुढे उभे राहती llजय.llll

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा l

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा l

राई रखुमाबाई राणीया सकळा l

ओवाळीती राजा विठोबा सावळा llजय.llll

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती l

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती l

दिंड्या पताका वैष्णव नाचती l

पंढरीचा महिमा वर्णावा किती llजय.llll

आषाढी कार्तिकी भक्तजन येती l

चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती l

दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती l

केशवासी नामदेव भावे ओवाळिती llजय.llll

(सदर आरतीची चाल पारंपारिक पद्धतिऐवजी प्रत्येक ओळीच्यामध्ये विठोबा शब्द घालून ह्मणण्याची पद्धत आहे.)

 

 

(२)

येई हो विठ्ठले माझे माउली ये l

निढळावरि कर ठेवूनि वाट मी पाहे llध्रु॰ll

आलिया गेलियाहाती धाडी निरोप l

पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा मायबाप ll

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला l

गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ll

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी l

विष्णूदास नामा, विष्णूदास नामा, जीवेभावे ओवाळी ll

 

सगुण हे आरती निर्गुण ओवाळू l

कल्पनेचे घृत घालू दीप पाजळू llll

ओवाळू आरती सद्गुरुनाथा, देवा पंढरीनाथा l

भावे चरणकमळावरी ठेविला माथा llध्रु॰ll

अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडू l

आशा मनिषा तृष्णा काम क्रोध कुरवंडू llll

सद्गुरूचे पूजन केले षोडशोपचारी l

रामानंद जीवन मुक्त झाला संसारी llll ओवाळू आरती...

 

 

 

 

प्रार्थना

घालीन लोटांगण वंदीन चरण l

डोळ्यांनी पाहिन रूप तुझे l

प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन l

भावे ओवाळिन ह्मणे नामा llll

त्वमेव माता च पिता त्वमेव l

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव l

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव l

त्वमेव सर्वं मम देव देव llll

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा l

बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् l

करोमि यद्यत् सकलं परस्मै l

नारायणायेति समर्पयामि llll

अच्युतं केशवं रामनारायणं l

कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं l

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं l

जानकीनायकं रामचंद्रं भजे llll

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे l

हरे कृष्ण हरे कृष्ण

कृष्ण कृष्ण हरे हरे llll

मंत्रपुष्पांजलि:

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् l

ते ह नाकं महिमान: सचन्तयत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ll

ॐ राजाधिराजाय प्रसंह्यसाहिने l

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे l

स मे कामान् कामकामाय मह्यं l

कामेश्वरो वैश्रवणो ददातु l

कुबेराय, वैश्रवणाय महाराजाय नम: l

ॐ स्वस्ति l साम्राज्यं भौज्यं,

स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं

माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्याईस्यात्

सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् l

पृथिव्यै समुद्रपर्यंतायाएकराळिति l

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत:

परिवेष्टारो मरुत्तस्याऽवसन् गृहे l

आविक्षितस्य कामप्रेविश्वेदेवा: सभासद इति ll

 

१)      सदा सर्वदा योग तुझा घडावा l

तुझे कारणी देह माझा पडावा ll

उपेक्षू नको गुणवंता अनंता l

रघुनायका मागणे हेचि आता ll

 

 

२)      शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे l

वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे l

कवि वाल्मिकीसारखा भाव ज्याचा l

नमस्कार त्या सद्गुरू रामदासा ll

 

 

 

३)      कैलासराणा शिव चंद्रमौळी l

फणींद्र माथा मुकुटी झळाळी l

कारुण्यसिंधु भव दु:ख हारी l

तुजवीण शंभो मज कोण तारी ll

 

४)      शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको l तीर्थासी जाऊ नको l

योगाभ्यास नको, व्रते मख नको l तीव्र तपे ती नकोl

काळाचे भय मानसी धरू नको l दुष्टासि शंकू नको l

ज्याचिया स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको ll

 

५)      ज्या ज्या ठिकाणी मान जय माझे l

त्या त्या ठिकाणी नीजरूप तुझे l

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी l

तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ll

 

६)      हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा l

गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व सोडीl

नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा l

तुका ह्मणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ll

 

७)      आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुद्धी l

आम्हा सर्वस्वी पाळावे दीना नाथा सांभाळावे l

माझे अन्याय अगणित कोण करील गणित l

माझी वाईट करणी रामदास लोटांगणी ll

 

 

८)      शरण शरण नारायणा मज अंगिकारी दीना l

भावे आलो लोटांगणी लोळेन तुमच्या चरणी l

अहो सांडीयेली काया वरून ओवळोनी पाया l

अहो तुका ह्मणे शीर ठेवियेले पायावर l

कृष्णा रामा रामा मनमोहन मेघश्यामा l

कृष्णा रामा रामा रामा...

 

९)      सुसंगति सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो l

कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो l

सदंध्री कमळी जडो, मुरडिता हटाने हटो l

वियोग घडता घडो, मन पावित्री जडो ll

 

ll श्री हरिहरेश्वर महाराज की जय ll

ll श्री खड्गेश्वर महाराज की जय ll

ll श्री गांगेश्वर महाराज की जय ll

ll श्री लक्ष्मी पल्लीनाथ महाराज की जय ll

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

श्री हरिहरेश्वर देवस्थान, शिपोशी येथील श्री हरिहरेश्वराचे त्रिपुरोत्सवांत पारंपारिक पद्धतीने ह्मटले जाणारे काही अभंग व भजने

अभंग १ ला: सोमवार

नमो नमो सदाशिवा l गिरिजापति महादेवा ll

शिरी शोभे जटाभार l गळा वासुकीचा हार ll

अंगा लावुनियां राख l मुखें रामनाम जप ll

तुका ह्मणे शिवशंकरा l दीनावरी दया करा ll

अभंग २ रा: मंगळवार

जगदंबे मी बाळ तुझा गे कृपा करी माते l

दीन दयाळे कृपा कटाक्षे पाही अंबे माते ll

भव काननी मी वाटची चुकलो गे धरि मज होते l

प्रपंच डोहीं बुडुनी मरतो काढी त्वरित वरूते ll

विधि-हरि-हर उत्पत्ति-स्थिती-लय कार्य इथे करते l

तुजविण त्याते शक्ति कैची स्तविती तुजला ते ll

अघटित- अगाध महिमा तुझा न कल्पवे चित्ते l

भक्ता दर्शन देउनी तारी बाळ मुकुंदा ते ll

 

अभंग ३ रा : बुधवार

नाथाच्या घरची उलटी ही खूण ll

पाण्याला लागली मोठी तहान ll

बाई म्या एक नवल देखिले ll

वळचणीचे पाणी आढ्याला गेले ll

हातामध्ये घागर, बाहेर पाणी ll

पाण्याला पाणी आले बांधोनी ll

शेत पेरिले त्यासि कणीसहो आले ll

राखणवाल्याला त्याने गिळीले ll

मडके खावोनी भात टाकीला ll

बकऱ्याचे पुढे देव कापिला ll

एकनाथ स्वामी ह्मणे मार्ग हा उलटा ll

जाणेले तोचि गुरूचा बेटा ll

 

अभंग ४ था : गुरुवार

तीन शिरे सहा हात l तया माझा दंडवत ll

काखे झोळी पुढे श्वान l नित्य जान्हवीचे स्नान ll

माथा शोभे जटा भार l अंगी विभूति सुंदर ll

शंख, चक्र, गदा हाती l पायी खडावा गर्जती ll

तुका ह्मणे दिगंबर l तया माझा नमस्कार ll

 

अभंग ५ वा : शुक्रवार

मर्जी देवाची, देवाची मिथ्या धाव मनाची ll

मनांत येते हत्ती, घोडे, पालखीत बैसावे ll

देवाजीच्या मनात याला पायी चालवावे llll

लोड, तिवासा नरम बिछाना सुंदर कांता व्हावी ll

देवाजीच्या मनात मागे कर्कशा लावावी llll

महाल, मुलुखमें पूर्ण खजीना घरात पैका व्हावा ll

देवाजीच्या मनात याला दरिद्री ठेवावा llll

बल्लव ह्मणे मनात येते काहीही न करावे ll

अहो रात्र सोडूनी धंदा देवा आळवावे ll

 

 

 

अभंग ६ वा : शनिवार

धन्य अंजनीचा सुत l त्याचे नाव हनुमंत ll

त्याने सीता शुद्धी केली l रामसीता भेटविली ll

द्रोणगिरी जो आणिला l लक्ष्मण वाचविला ll

ऐसा मारुती उपकारी l तुका लोळे चरणावरी ll

 

अभंग ७ वा : सोमवार

करू प्रथम नमन l वंदू देव गजानन ll

गौरीहराचा कुमार l नाव त्याचे लंबोदर ll

रिद्धी-सिद्धीचा जो दाता l आली विघ्ने निवारिता ll

तुका ह्मणे हृदयी ध्याता l पारब्रह्म आले हाता ll

 

अभंग ८ वा : बुधवार

नमन माझे आता l चरणासि एकदंता ll

रंगा येई गणपती l संगे घेउनी सरस्वती ll

पाठीमागे राही उभा l भजनासि देइ रंगा llll

मूषक- हंस वाहन दोन्ही l यावे दंपत्ये बैसोनि ll

मुद्गल ह्मणे स्वामि राजा l तया नमस्कार माझा ll

 

अभंग ९ वा : गुरूवार

देव गजानन रे वंदू देव गजानन रे ll

देव गजानन, गौरीनंदन मूषक वाहन रे ll

सिंदूर बदन, पिवळे वसन मोदक भक्षण रे ll

शमी दूर्वा तुजला अर्पुनी करती पूजन रे ll

तुजला ध्याता सुखरूप झाला गोसावीनंदन रे ll

 

 

अभंग १० वा : एकादशी व शेवटचा दिवस

शिवसुता तुला मनी ध्याता l

वाटला मोद मम चित्ता ll

अखिलही जगाचा त्राता l

नाहि की तुझ्यासम दाता ll

भाविका नुरे तव चिंता l

सेवितां नीतिच्या पंथा ll

ऐकता दीनांची वाणी l

झडकरी येसि धावोनी l

तारिसी तयाते व्यसनी ll

तू अससी दीन दयाळा, करिसि सांभाळ

खलाते काळ, जना गांजोनी

करिती ते धुमाळी अवनी ll

शिवसुता तुला मनी ध्याता ll

 

अभंग ११ वा : शुक्रवार

भवनदीत उतरुनी जाया ll

तुम्ही भजा आता गणराया ll

हे कशास करिता मेळे ll

जरि सदा द्वैत मनिं खेळे ll

ह्मणु तुम्हा काय या वेळे ll

हे हाल कसे सोसाल, मिळेना खाया llll

नर तनु मिळाली खाशी ll

का तुम्हा दुर्दशा ऐसी ll

मनि वसे न लज्जा कैसी ll

घ्या बोध, करा मानि शोध, नसे शामवाया llll

तुम्ही अजुनि सावध व्हाना ll

का नेत्र जरा उघडाना ll

लवविता सदोदित माना ll

व्हा दीन, ईश पदि लीन, मोक्ष साधाया llll

 

अभंग १२ वा

तुज पाहता सामोरी l दृष्टी न फिरे माघारी ll

माझे चित्त तुझ्या पाया l मिठी पडली पंढरीराया ll

नोहे सारिता निराळे l लवण मेळविता जळे ll

अहो, तुका ह्मणे बळी l जीव दिधला पायातळी ll

(हा अभंग एकादशीच्या दिवशी पाचव्या फेरणीचेवेळी धर्मशाळेपर्यंत ह्मणावयाचा व तेथे भजे मुकुंदम् ह्मणून नाचवायचे. ६ ते ११ फेऱ्या धावत्या घालावयाच्या.)

 

अभंग १३ वा

उभा ठाकलोसे द्वारी l

देवा याचक भिकारी ll

मज भीक काही देवा l

प्रेम भातुके पाठवा ll

देवा याचकांचा भार l

नये घेऊ येरझार ll

अहो, तुका ह्मणे धन l

दिल्या घेतल्यावाचून ll

(हा अभंग एकादशीच्या दिवशी पाचव्या फेरणीचे वेळी धर्मशाळेपर्यंत ह्मणावयाचा व तेथे भजे मुकुंदम् ह्मणून नाचवायचे. ६ ते ११ फेऱ्या धावत्या घालावयाच्या.)

 

 

 

 

१४ श्रीकृष्णाचा विडा : शेवटचा दिवस

विडा घ्या हो नारायणा l कृष्णाजगत्रय जीवना ll

विनवीते रखुमाबाई l दासी होऊनि मी कान्हा llll

शांति हे नागवेली l पाने घेउनिया करी ll

मीपण जाळूनीयां l चुना लावियेला वरी llll

वासना फोडूनिया l चूर्ण केली सुपारी ll

भावर्थ कापुराने l घोळियेली निर्धारी llll

विवेक हा कातरंगl रंगी रंगला सुरंग ll

वैराग्य जायफळ l मेळविले सकळ llll

दया हे जायपत्री l क्षमा लवंगा आणील्या ll

सुबुद्धि वेलदोडे l शिवरामीं अर्पियेले llll

विडा घ्या हो नारायणा ll

 

भजने

यारे, यारे, यारे या, नाम प्रभूचे गाऊया l

मंगलमूर्ती मोरया आनंदाने गाऊ या ll

शिवशंभो गणनाथ सरस्वती भावे l

हरिभजनी रंगा यावे ll

पार्वती नंदना तुझे गुण गावे l

हरिभजनी रंगा यावे ll

ईश्वरा, भजनी मन रमवावे l

हरिभजनी रंगा यावे ll

 

गजानन पाय वंदाया l

दुजा व्यवसाय तो वाया ll

सुलभ ही नसे मनुजकाया l

भव उतरा तरा माया ll

जुने बरवे दिवस गेले l

पुढे आता कठीण आले ll

अहो, लोका करा धंदा l

सोडूनि द्या त्या फुकट गमजा ll

 

श्रीगजानन, जय गजानन

जय जय गजानन मोरया

जय जय गजानन मोरया,

जय जय गजानन मोरया ll

 

हेरंब मोरया रिद्धी-सिद्धी रमणा ll

गणेश वक्रतुंड अखंड भजना ll

हेरंब गजवदना,

करी कृपेची छाया मजवरि

गणराया बा गणराया ll

 

भजे मुकुंदम्, श्रीनाथम्

भजे मुकुंदम् श्रीनाथम्

गोपीनाथम्, जगन्नाथम्,

अनाथनाथम् मन्नाथम्, भजे मुकुंदम् ll

 

रोज देव आत गेल्यावर श्रीसद्गुरुरायाची प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ll

झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची llधृ.ll

पदोपदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ll

सर्वहि तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी llधन्य हो..llll

मृदंग, टाळ, ढोल भक्त भावार्थे गाती ll

नामसंकीर्तने नित्यानंदें नाचती ll धन्य हो..llll

कोटी ब्रह्महत्या हरती करितां दंडवत ll

लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायांत ll धन्य हो..llll

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमासी ll

अनुभव ते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ll धन्य हो..llll

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरविला ll

श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ll धन्य हो..llll

 

श्री दत्ताची आरती

श्रीपाद श्रीवल्लभ गुरूवर तारि तारि मजला ll

श्रमलो मी या प्रपंच धामी आलो शरण तुला ll

करितां आटाआट प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व ll

ह्मणवुनि भजन तुझे मज देवा भासे सत्यत्व ll

किंचित मात्र कृपा जरि मजवरि करिसी उदार मन ll

चुकेन मी या विषय सुखाच्या आहारी जाणे ll

कृष्णा तटिं निकटी जो विलसे औदुंबर छाये ll

हंस परात्पर भारतीनायक लीन तुझे पायी ll

 

एकादशी व शेवटच्या धावत्या फेरणीमध्ये ह्मणावयाची भजने

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या

काठी चेंडू झुगारिला, विटि दांडू सुवर्णाचा चेंडू डाव मांडिला,

आट्या पाट्या आणि हुतुतु गोट्या l डाव मांडिला

 

2)ारायण विधि अत्रीनाथ दत्त जनार्दन एकनाथ

 

3) कोल्हापुरी अंबाबाईचे द्वारी भिक्षा मागतो ब्रह्मचारी

 

4) पांच शिखरे लहान थोर कळस सोनेरी l

देवाचा कळस सोनेरी ll आजि म्यां पाहिली पंढरी ll

 

5) शंभो शिखरीचा राजा l तयाला नमस्कार माझा l

शंभो शिखरावरुनीयेतो l आम्हाला सांभाळूनी नेतो ll

 

हेचि दान देगा देवा...

 

फेरीमध्ये नाचताना ह्मणावयाची भजने

घ्या मुकुंद मुरारी गोविंद l आनंद कंद हा घ्या छंद l

घ्या मुकुंद मुरारी गोविंद l वाजवि कान्हा वाद्ये नाना l

गाति तनाना व्रजललना l हमामा हुंबरी फुगड्या टिपरी l

खेळति नारी नरवृंद l घ्या मुकुंद मुरारी गोविंद ll

गोप बाळा, करुनि गोळा मांडि काळा सावळा

अंत नाही त्या सुखाला होय सकला आनंद घ्या

मुकुंद मुरारी गोविंद ll

या भजनाच्या प्रत्येक कडव्याला नाचण्याची चाल बदलून नाचवायचे असते.

 

सांगड बांधारे भक्तिची या रघुनाथ नामाची ll

या या रघुनाथ नामाची ll

नाचण्याची चाल बदलून

लाटा उसळती विषयाच्या बहुत प्रपंचाच्या

या या बहुत प्रपंचाच्या ll

नाचण्याची चाल बदलून

प्रपंच भोवरा भोवरा फिरतसे गरगरा

हा हा फिरतसे गरगरा ll

नाचण्याची चाल बदलून

संसार सागर सागर भरला जातो पुर

हा हा भरला जातो पुर ll

नाचण्याची चाल बदलून

माणकोची बोधला बोधला हरिनामी रंगला

हा हा हरिनामी रंगला ll

गोपाल कृष्ण राधाकृष्ण l गोपालकृष्ण राधा कृष्ण ll

श्रीकृष्णापति गोपाळ बोलती l

अकळ न कळसी तूं अहा हा हा l

तूं अहा हा हा l

जय गोपाल कृष्ण l राधा कृष्ण llll

 

( चाल बदलून नाचावयाचे)

मामा मारु गेलासी आपटिले गजासी l

मल्लयुद्ध खेळसी हुतुतुतू ll

जय गोपाल कृष्ण l राधा कृष्ण llll

अजगर मारिला वणवाही ग्रासीला l

गोवर्धने उचवीला अबबब ll

जय गोपाल कृष्ण l राधा कृष्ण llll

केसियासि मारिले l शंकरासि चूर्ण केले l

दोन्ही वृक्ष उन्मळीले अरेरेरेरे ll

जय गोपाल कृष्ण l राधा कृष्ण llll

( चाल बदलून नाचावयाचे)

ऐसे तुझे पवाडे ब्रह्मादिक झाले वेडे l

विष्णुदास नामा ह्मणे अयोयोयो ll

जय गोपाल कृष्ण l राधा कृष्ण llll

 

 

ll श्री हरिहरेश्वरो जयति ll

श्री हरिहरेश्वराच्या वार्षिक उत्सवातील नित्याचे कार्यक्रम

 

कार्तिक शु ll सकाळी नित्य पूजा

रात्रौ आरती व मंत्रपुष्प आरत्या ह्मणताना प्रारंभी आवडी गंगाजळे व अघसंकट भयनाशन व गणपतीची अशा आरत्या ह्मणतात व त्यानंतर बाकी देवांच्या आरत्या ह्मणतात. शेवटी सगुण हे आरती ... व त्यानंतर घालीन लोटांगण ह्मणून आरत्यांचा कार्यक्रम पुरा होतो. त्यानंतर सांब सदाशिव सांब l हरहर सांब सदाशिव सांब ll असे भजन त्रिवार ह्मणून पुंडलिका वरदे हरि विठ्ठल वगैरे जयजयकार होतो. शेवटी, श्री हरिहरेश्वर महाराज की जय व श्री खड्गेश्वर महाराज की जय असे ह्मणतात. त्यानंतर मंत्र- जागराचा कार्यक्रम होतो. त्यामध्ये वैदिक लोक ऋग्वेदसंहिता, ब्राह्मणे, शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष, निऋक्त, पदे, क्रम, जटा, घन यापैकी काही भाग ह्मणतात. त्यांनतर कै. महादेव गणेश उर्फ बाळाभाऊ तळवलकर यांच्या स्मरणार्थ कीर्तन होते व शेवटी खिरापत वाटतात.

 

कार्तिक शु ll १० सकाळी गणपतीवर सहस्रावर्तन व लघुरुद्राभिषेक व दुपारी व्यवस्थापकांकडे प्रसाद.

रात्री ठीक ८-३० वाजता आरतीला सुरुवात. ८-३० ते ९ आरती. ९-०० ते ९-३० मंत्रपुष्प, त्यानंतर ९-३० ते ११-०० छबीना.

श्री हरिहरेश्वराची उत्सव मूर्ति शिवहर शंकर भोळा, त्याच्या गळा रुंड माळा हे भजन ह्मणत देवांसमोरील अंगणातील पालखीत नेऊन ठेवण्यात येते व पालखी उचलताच प्रदक्षिणांना सुरुवात होते. यावेळी पालखी खांद्यावर घेण्याचे काम भक्त मंडळीच करतात. आघाडी चले सांबराजा पिछाडी संतनका फौजा हे भजन प्रारंभी ह्मणून नंतर गणपतीचा अभंग सांगतात व नंतर रीतसर दिंडी सुरु होते. ती देवासमोर पुन: येते तेव्हां एक प्रदक्षिणा पुरी होते, ह्मणून भजन सांगून फेर धरून नाचतात. शेवटी पार्वतीपते ह्मणून भजन संपवितात. त्यानंतर एखादे देवाचे भक्तिगीत ह्मणण्यात येते. त्यांनतर लवथवती विक्राळा या आरतीचे पहिले कडवे ह्मणण्यात येऊन शेवटी पार्वतीपते ह्मणतात व आशा रीतीने दुसरी प्रदक्षिणा पुरी करतात. आशा एकूण पाच प्रदक्षिणा होतात. प्रदक्षिणा संपताना हेचि दान देगा देवा... आम्ही अपराधी अपराधी... शरण शरण नारायण... हे ह्मणून भजन पुये करण्यात येते. त्यानंतर शिवहर शंकर भोळा, त्याच्या गळा रुंड माळा हे भजन ह्मणत उत्सवमूर्ती पुन: देवालयात जागेवर नेऊन ठेवण्यात येते. त्यानंतर धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची..श्रीपादश्रीवल्लभ नरहरी... घालीन लोटांगण.. ह्मणून छबिन्याचा कार्यक्रम पुरा होतो.

 

कार्तिक शु ll ११ सकाळी श्रींवर लघुरुद्राभिषेक

रात्री ठीक ९-०० वाजता आरतीला सुरुवात व वरीलप्रमाणेच कार्यक्रम होतात. मात्र या दिवशी अकरा प्रदक्षिणा होतात. त्यापैकी पाच भोवत्या व सहा धावत्या असतात. पाच भोवत्यांपैकी पाचवी भजे मुकुंद.. ची विशेष प्रदक्षिणा असते; व तीत दक्षिण, उत्तर व पूर्व आशा तीन ठिकाणी ते भजन ह्मणत नाचतात. उंच उडी हा या प्रदक्षिणेचा विशेष होय. या दिवशी गायन झाल्यानंतर व कीर्तनाचे पूर्वी एखादे धार्मिक प्रवचन ठेवण्यात येते. दिवस महाएकादशीचा असल्यामुळे वेळचे विशेष बंधन नसते.

 

कार्तिक शु ll १२ सकाळी श्रींवर लघुरुद्राभिषेक

रात्री ठीक ८-३० वाजता सुरुवात व शु ll १० प्रमाणेच सार्व कार्यक्रम होतात.

 

कार्तिक शु ll १३ सकाळी नित्यपूजा, श्रींवर लघुरुद्राभिषेक

रात्री ठीक ८-३० वाजता सुरुवात व शु ll १० प्रमाणेच सार्व कार्यक्रम होतात. एखादा विशेष कार्यक्रम असल्यास तो कीर्तनापूर्वी होतो.

 

कार्तिक शु ll १४ सकाळी नित्यपूजा, श्रींवर लघुरुद्राभिषेक

रात्री ठीक ८-३० वाजता सुरुवात व वरीलप्रमाणेच सर्व कार्यक्रम होतात.

 

कार्तिक शु ll १५ सकाळी नित्यपूजा, श्रींवर लघुरुद्राभिषेक

दुपारी सर्व भक्तांस महाप्रसाद.

रात्री एकादशीप्रमाणेच अकरा प्रदक्षिणा व त्यात पाचवी भजे मुकुंद... ची विशेष प्रदक्षिणा असते. रात्री दोन्ही दीपमाळांवर त्रिपुर.. लावण्यात येतो. देवळातही दिव्यांची रोषणाई करण्यात येते. मध्यरात्री श्रींवर महापूजा- बांधतात (ह्मणजे देवाच्या पिंडीभोवती तांब्याच्या चांदीचा मुखवटा बसवतात.) त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष कीर्तनापूर्वी अहवाल वाचन करतात. सर्वच भक्त या कार्यक्रमाला अगत्यपूर्वक उपस्थित राहतात. कीर्तनानंतर पाहते लळित ह्मणून एक विशेष कार्यक्रम असतो. या वेळी सद्गुरू द्यावा प्रासाद जी झडकरी या पदात वर्णन केलेल्या निरनिराळ्या भक्तांची सोंगे पूर्वी आणीत असत व त्याच्या आपसातील संभाषणात अद्वैत वेदांतांचे प्रतिपादन असे. अलीकडे, त्याऐवजी, श्रींचे निरनिराळे भक्त निरनिराळी विनोदप्रचुर सोंगे आणून १५-२० मिनिटे करमणुकीचा कार्यक्रम करतात. त्यानंतर कीर्तनकार, गवई, पेटीवाले, तबलजी व व्यवस्थापक यांना श्रीफळ, खारका, बदाम, तुळशीची पाने व बेलाची पाने अशा वस्तू प्रसाद ह्मणून दिल्या जातात. हरीला तुळस प्रिय व हराला बेल प्रिय ह्मणून श्रीहरिहरेश्वराला तुळशी व बेल देण्यात येतो व तक्षिमेचा नारळ फोडून त्यातला प्रसाद सर्वजण घेतात. श्रीहरिहरेश्वर हा देव सर्व शिपोशीकर आठल्यांचा आहे हीच भावना या अनेक वर्षे चालत आलेल्या अव्याहत प्रथेवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर एका शेल्यावर देवाची पावले हळदीने काढून हरीचे पद वंदा हे पद ह्मणत, सर्वजण त्याला नमन करतात व नंतर काकड आरती ह्मणून थोडे नाचतात व थोडा गुलाल उधळतात, आठल्ये यांचे देवांत श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही आहेत. कोल्हापूरची अंबाबाईही आहे. आठल्ये देवळे येथे आले ते मूळ कऱ्हाड प्रांतांतील ओटोली या गावाहून आले. ह्मणून त्यांस आटलीये व पुढे अपभ्रंशाने आठल्ये ह्मणू लागले. हा पूर्व संबंध लक्षात घेऊन, ती प्रांतस्थ देवता- कोल्हापूरची अंबाबाईही त्यांनी स्वीकारली. त्या गोष्टीचे स्मरण आपल्या उत्सवातही राहिले पाहिजे या उद्देशानेच आपल्या पूर्वजांनी या उत्सवातही ही काकड आरती योजलेली आहे.

त्यानंतर कीर्तन समाप्ती होते. त्यावेळी भक्तगण देवाला नवस करतात व पावलेले नवस फेडतात. श्रीहरिहरेश्वर हे एक जागृत देवस्थान आहे अशी सर्व भक्तांची नितांत श्रद्धा आहे व त्यामुळे प्रतिवर्षी असे नवस केले जातात. त्यांनतर आकल्प आयुष्य व्हावे तया कुळां l माझिया सकळा हरीच्या दासा या श्री नामदेव महाराजांच्या अभंगाने कीर्तनकार सर्वांचे कल्याण चिंतितात. त्यानंतर विडे- शेजारती होऊन श्री विठ्ठलाचे भजन करतात. शेवटी प्रसाद होऊन सात दिवस चाललेला हा उत्सव समाप्त होतो.

 

अभंग

(राग- भैरवी)

नाही केली तुझी सेवा l

दु:ख वाटे माझ्या जिवा llll

नष्ट पापीण मी दीन l

नाही केले तुझे ध्यान llll

रात्रंदिन मजपाशी l

दळू कांडू लागलासी llll

क्षमा करी देवराया l

दासी जनी लागे पाया llll

नाही केली तुझी सेवा l

ll श्री हरिहरेश्वर महाराज की जय ll

ll श्री खड्गेश्वर महाराज की जय ll

ll श्री गांगेश्वर महाराज की जय ll

ll श्री लक्ष्मी पल्लीनाथ महाराज की जय ll

 

 

 

 

 

 

 

मारुती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी

करी डळमळ भूमंडल सिंधुजळ गगनी

गडबडीले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी

सुरनर निशाचर त्या झाल्या पळणी

जय देव जय देव जय हनुमंत तुमचे नि प्रसादे

न भी कृतांता

दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द

थरथरला धरणीधर मानिला खेद

कडकडीले पर्वत उड्डगण उच्छेद

रामी रामदासा शक्तीचा बोध

 

 

 

मारुती

जय जय अंजनीबाला

पंचारती ही करितो तुजला

सीताशुद्धीस्तव जावोनी

जाळीली लंका दुष्ट वधोनी

जानाकीसह रामाला

नेसी अयोध्ये सुख्धामाला

चरणी शरण मी भावे आलो

ब्रह्म सदोदित ह्मदयी खेळो

ऐशा दे ज्ञानाला

धन्य करी या बलवत्कविला

 

 

नवरात्र देवीची आरती

प्रथम मुळारंभा घटशोभा

तोरण मकरस्तंभां आरती तुजअंबे जगदंबे तारक विश्वकुटुंबे जय जय जगदंबे

दुसरी ही पूजा तुज वोजा

ओवाळीन सुखाकाजा

लोकत्रय छंदा आनंदा

गाती मानसवृंदा

चवथी ही पूजा तुज वोजा

ओवाळीन सुखकाजा

पंचारती पायी लवलाही

सुंदर अंबाबाई

षडगुण संपन्न अन्नपूर्णा

देसी सुमंगल सदना

सप्तस्थळ मेळी रसभाळी

नाना वाक्य रसाळी

भावा भरी भाटा घनदाटा

व्यास मूळ पीठा

नवदिनी नवरात्र शिवस्तोत्र

गाती मंगलमंत्र

दास सदा तुज ध्यायी

कुळदेवी मुळ्मायी